*एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा*
*देशभरातील २९ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी*
*पुणे:* एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ(एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसरातील संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये ११ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान देशभरातील २९ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. ज्यात, ते कोळसा मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय समोरील समस्यांवर पर्याय देण्यासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडतील. प्रत्येक समस्येच्या विजेत्यास ₹1 लाख चे बक्षीस दिले जाईल. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ११ डिसेंबर रोजी पुष्कराज ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेन्द्र गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ..मंगेश कराड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सोबतच, डॉ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल सेंटर मुख्य अधिकारी डाॅ.रेखा सुगंधी, सहाय्यक नोडल अधिकारी डाॅ.निशांत टिकेकर, स्पर्धा निमंत्रक प्रा.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे केंद्रीय उद्घाटन 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता शिक्षण मंत्रालयाच्या वतीने अभासी पद्धतीने केले जाईल. 2017 साली सुरू झालेला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (एसआयएच) हा भारतातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. हा जगातील सर्वात मोठा ओपन इनोव्हेशन मॉडेल म्हणून ओळखला जातो. यंदा संस्थात्मक हॅकाथॉन्समध्ये 240% वाढ झाली आहे. 2023 मधील 900 हॅकाथॉन्सच्या तुलनेत 2024 मध्ये 2247 हॅकेथॉन आयोजित झाले. यासह, 49,000 विद्यार्थी संघांनी राष्ट्रीय स्तरासाठी पात्रता मिळवली असून त्यांनी 54 मंत्रालये, विभाग आणि उद्योग यांनी दिलेल्या 250+ समस्यांवर काम केले आहे, अशी माहिती डाॅ. रेखा सुगंधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसआयएच 2024 मध्ये आरोग्य सेवा, शाश्वतता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन अशा 17 प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. एमआयटी-एडीटीयूच्या हार्डवेअर एडिशनमध्ये 168 स्पर्धक आणि 32 मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. हा उपक्रम केवळ नावीन्यपूर्ण कल्पनांचा मेळावा ठरणार नाही, तर सरकारी अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात थेट संवाद घडवून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्राधान्यक्रमांसाठी उपाय विकसित करण्यासाठी प्रेरित करेल, अशी माहिती प्रा.कापरे यांनी दिली.