आषाढी एकादशी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. या निमित्ताने अनेक वारकरी, पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्याच्या पायावर माथा टेकवून आशीर्वाद घेतात. मात्र ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते घरच्या घरी देखील अशा पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करू शकता
हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असते. वर्षभरातील २४ एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्वाची असते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात. या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हटले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात सर्व शुभ कार्ये थांबतात. भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात. आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खास असतो. वारकरी सांप्रादायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठूरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. तसेच या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजाही होते.
पण काही असेही लोक असतात, ज्यांना काही कारणामुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. मात्र या शुभ दिवशी तुम्ही घरच्या घरीही विठूरायाला नमन करून पूजा करू शकता आणि घरच्या घरी देखील आषाढी एकादशी साजरी करू शकतात.
यंदा कधी आहे आषाढी एकादशी ?
तिथीनुसार आषाढ शुक्ल एकादशी अर्थात देवशयनी एकादशीचे व्रत उदया बुधवार, १७ जुलै २०२४ रोजी करण्यात येणार आहे.
अशी साजरी करा आषाढी एकादशी
वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास केला जातो. एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असते. आजच्या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूचीही उपासना करावी.
सकाळी आंघोळ आटोपून देवाजवळ दिवा लावावा. उदबत्ती, धूप, निरांजन लावावे. त्यानंतर मनोभावे पूजा करावी.
देवांना आधी शुद्ध पाण्याने स्नान घालावे, त्यानंतर पंचांमृताने स्नान घालावे. परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे. स्वस्छ वस्त्राने पुसून देवांना देव्हाऱ्यात ठेवावे.
त्यांना अष्ट गंध अथवा कुंकू लावावे. पिवळी फुलं आणि तुळस वाहावी. एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो असे म्हणतात, त्यामुळे देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
देवाची आरती करावी आणि सुख समृध्दीसाठी प्रार्थना करावी. घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे. शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जावे.
एकादशीच्या दिवशी पुर्णवेळ उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करण्याचा सल्ला धर्म शास्त्रात देण्यात आलेला आहे.
एकादशीचे महत्व
धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो. त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही कामं करण्याचा सल्ला देण्यात येतो. एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे.
एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्रांचा जप करावा. भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे.
तामसिक पदार्थांपासून दूर रहावे
देवशयनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतेही नशा करणारे पदार्थ सेवन करू नयेत.
वाईट विचार नकोत
एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये,अथवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे. भगवान विष्णूची कथा ऐकावी आणि मंत्रांचा जप करावा.
वरील माहिती हि धर्मग्रंथांच्या स्तोत्रां आधारे दिली गेलेली आहे.
आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही