पुणे -‘अहो विक्रमार्का ‘ या चित्रपटातील अर्चना या गाण्याचे प्रसारण नुकतेच मिहीर कुलकर्णी यांच्या ग्रॅव्हिटी फिटनेस जिम मध्ये करण्यात आले.
* अल्पावधीतच गाण्याला तुफान प्रतिसाद *
दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल ‘अहो विक्रमार्का ‘ च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. पुण्यातील उद्योजक मिहिर कुलकर्णी यांनी निर्मित केलेला हा दुसरा चित्रपट असून याआधी त्यांनी ‘अ ब क ‘ या मराठी चित्रपटाची निर्मिती हिंदी चित्रपट सृष्टीतील सुनील शेट्टी आणि तमन्ना भाटिया यांना घेऊन केली होती. ‘अहो विक्रमार्का ‘ या चित्रपटातील अर्चना या गीताचे प्रसारण नुकतेच मिहीर कुलकर्णी यांच्या बिबवेवाडी येथील ग्रॅव्हिटी जिम येथे करण्यात आले. यावेळी देव गिल आणि चित्रपटाचे सहनिर्माते अश्विनी कुमार मिश्रा उपस्थित होते. अभिनेता देवगिरी यांच्या पत्नी आरती देवेंदर गिल यादेखील चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.
गाणे प्रसारण करतेवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देव गिल म्हणाला माझ्या आजवरच्या सर्व कलाकृतीवर व भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. आजवर मी निगेटिव्ह रोल करत आलो त्यावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आज प्रथमच नायक म्हणून या चित्रपटातून मी प्रेक्षकांसमोर येत आहे. एक वेगळी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा त्याने व्यक्त केली.
निर्माते मिहिर कुलकर्णी म्हणाले, आमच्या ग्रॅव्हिटी एंटरटेनमेंट निर्मित हा दुसरा चित्रपट आहे. देव गिल ने चित्रपटाची कहाणी ऐकल्यावरच हा चित्रपट करावा हा निश्चय केला. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम बनविण्यासाठी तसेच त्यातील संगीत, चित्रीकरण, ॲक्शन दृश्य आणि कथा यावर विशेष मेहनत घेऊन आम्ही हा ब्लॉकबस्टर चित्रपट पॅन इंडिया ५ भाषांमध्ये 30 ऑगस्ट 2024 ला प्रदर्शित करीत आहोत.
मिहिर कुलकर्णी म्हणाले, आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर आधारित या चित्रपटात परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत देव गिल पहायला मिळणार आहे”. सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित, अनिल नगरकर अशा अनेक मराठी कलाकारांची साथ या चित्रपटासाठी लाभली असून ‘अहो विक्रमार्का ‘ हा चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी चित्रपट जो अभूतपूर्व साहस, जाज्वल्य, देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा चित्रपट ठरेल असा विश्वास मिहिर कुलकर्णी यांनी व्यक्त केला.