सुदेश भोसले यांच्या गाण्यावर थिरकले पुणेकर.
पुणे – कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या मदती करता आयोजित केलेल्या कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गरजू कलावंतांच्या मदत निधी साठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी नुकतेच पुण्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंग मंदिर येथे ‘सुदेश भोसले लाइव्ह कॉन्सर्ट विथ मेलडी मेकर्स’ हा कार्यक्रम सादर केला. सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. सर्वांना उत्कंठा होती ती सुदेश भोसले यांना रंगमंचावर पाहण्याची. आणि ते अवतरले. रसिकांना नम्र अभिवादन करीत आपल्या दमदार आवाजात लावारिस चित्रपटातील ‘अपनी तो जैसे तैसे..हे गाणे म्हणत सुदेश भोसले थेट मंचावरून खाली उतरले. भोसले यांना हात मिळवण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. गाणे गात गातच सुदेश भोसले प्रेक्षकांच्या गराड्यात शिरल्यामुळं कार्यक्रमाची रंगत वाढली. दर्दे दिल दर्दे जिगर.. ये जो मोहब्बत हैं.. इंतेहा हो गई इंताजार की.. माय नेम इज अँथनी गोन्सालविस..प्यार दिवाना होता है.. रंग बरसे भीगे चुनरवाली.. मैं हू डॉन.. अशी एकाहून एक सरस गाणी सादर करीत त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. भोसले यांनी दमदार आवाजात गायन आणि विविध अभिनेत्यांच्या आवाजात मिमिक्री करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. गाणी गात असतानाच रंगमंचावरून उतरून रसिकांबरोबर सेल्फी काढत, नृत्य करीत तीन तास बहारदार कार्यक्रम सादर केला. पुणेकर रसिकांनी देखील त्यांच्या प्रत्येक गाण्यावर नृत्य करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या वतीने सुदेश भोसले यांचा पुणेरी पगडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच सुदेश भोसले यांचा हातात माईक घेतलेला धातू मधे बनवलेला अर्धपुतळाही भेट देण्यात आला. या वेळी त्यांनी पुण्यात कार्यक्रम करतानाचे समाधान आणि आनंद काही औरच असतो अशा भावना व्यक्त केल्या आणि फाउंडेशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, कार्याध्यक्ष बबलू खेडकर, सचिव गणेश मोरे, उपसचिव अश्विनी कुरपे, खजिनदार रशीद शेख, उपखजिनदार मनोज माझीरे, संचालक सोमनाथ फाटके, अमीर शेख, राजरत्न पवार, अभय गोखले तसेच भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, दीपक मानकर, बाळासाहेब दाभेकर, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पुणे मनपा सह आयुक्त, सांस्कृतिक विभाग श्री बल्लाळ, सांस्कृतिक केंद्रप्रमुख राजेंद्र कामठे, उद्योजक फतेचंद रांका, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील आणि रत्ना दहिवेलकर यांनी केले तर आभार राजरत्न पवार यांनी मानले.
PUNE24 NEWS
जयश्री डिंबळे
9623968990 / 9689934162