भीम नगर वासियांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

*भीम नगर वासियांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा*

पुणे :  एरंडवना येथील शिला विहार कॉलनी मधील भीम नगर वसाहतीच्या पुनर्वसनामध्ये बिल्डर कडून फसवणूक झाली आहे. या संदर्भयकडे लक्ष वेधून  घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर शनिवारी भीम नगर वासियांचा बिऱ्हाड मोर्चा धडकला. 

रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या बिऱ्हाड मोर्चात देविदास ओव्हाळ, जावेद शेख, हरी बागडे,  सुनिल डमरे,  दादू गायकवाड,  सुदाम शिंदे, उमा साठे, स्नेहल गायकवाड,  रेश्मा पल्ला,  रईसा शेख,  निशिकांत पोळ,  प्रतीक डंबाळे,  प्रभू सुनगर,  सिकंदर मुलाणी यांच्यासह स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. 

भीम नगर येथील 216 कुटुंबीयांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत करण्याचा बोगस प्रस्ताव भक्ती एंटरप्राइजेस मार्फत दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये यापूर्वीच बिल्डरसह 20  जणांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाणे येथे फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच योजनेच्या मंजुरीसाठी स्थानिक मूळ रहिवाशां ऐवजी बाहेरची बोगस लाभार्थी तयार करण्याचा गंभीर प्रकार बिल्डर कडून करण्यात आलेला आहे व त्याद्वारे स्थानिक नागरिकांना भीम नगर पासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर सक्तीने पुनर्वसन करण्याचा घाट सध्या बिल्डरने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणामार्फत घातलेला आहे.  हा अन्याय असल्याने याविरुद्ध भीम नगर झोपडपट्टी धारक मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहेत. 

यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले, झोपडपट्टी धारकांची एसआरए च्या नावाखाली होत असलेली लुगडणूक व फसवणूक याचे उत्तम उदाहरण म्हणून भीम नगर कडे पाहता येईल, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांनी व त्यांच्या संस्था संघटनांनी एकत्रित लढा उभारावा. सक्तीचे पुनर्वसन रद्द करून आम्हाला आहे त्या ठिकाणी राहून द्यावे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनवणी पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे डंबाळे यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील नियोजित कार्यक्रमामुळे सांगली येथे असल्याने त्यांचे निवेदन पाटील यांचे स्वीय सहाय्यक राहुल देशपांडे यांना देण्यात आले.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment