*हातमागावरील कलात्मक, सुंदर व दुर्मिळ उत्पादनांची पुणेकरांना पर्वणी*

*हातमागावरील कलात्मक, सुंदर व दुर्मिळ उत्पादनांची पुणेकरांना पर्वणी*

– शेफाली वैद्य यांचे प्रतिपादन; इंडियन सिल्क गॅलरीतर्फे २५ मार्चपर्यंत ‘माय प्राईड माय हॅन्डलूम’ प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले

पुणे: “देशातील १४ राज्यांतील प्रमुख शहरांतील हातमाग कारागिरांनी उभारलेल्या ४० स्टॉल्समधून हातमागावरील कलात्मक, सुंदर आणि दुर्मिळ उत्पादनांची पर्वणी पुणेकरांसाठी खुली झाली आहे. पोचमपल्ली, मदनपल्ली, कलमकरी, कांचीपुरम, गढवाल, वेंकटगिरी, चेंदेरी, माहेश्वरी, इरकल, नयनपेट, बनारस, कोलकाता आणि इतर अनेक शहरातील नाविन्यपूर्ण साड्या, ड्रेस मटेरियलने हे प्रदर्शन सजले आहे. विणकाम, हातमाग कामगारांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका व कापड उद्योगाच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांनी केले.

विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचालित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित ‘माय प्राईड, माय हॅन्डलूम’ या भव्य हातमाग प्रदर्शनाचे (बिगेस्ट हॅन्डलूम एक्झिबिशन) उद्घाटन शेफाली वैद्य यांनी केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक (नि.) श्रीनिवास राव, कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ४० पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे. हॉटेल सेंट्रल पार्क, संभाजी उद्यानासमोर, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे २५ मार्च २०२५ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

शेफाली वैद्य म्हणाल्या, “केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग आणि खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून विणकर, हातमाग व्यावसायिकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. स्वदेशी, ‘लोकल फॉर ग्लोबल’ योजनेमुळे देशभरातील छोट्या व्यावसायिकांना पाठबळ मिळत आहे. या प्रदर्शनात देशाच्या विविध भागात असलेली विशेषता हातमाग, कॉटन, सिल्क, लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर कलाकुसर, नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत.”

श्रीनिवास राव म्हणाले, “देशभरातील विणकर कामगारांनी केलेली कलाकुसर एकत्रितपणे पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे हे प्रदर्शन आहे. कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे. रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते. ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत.”

शिवाजीनगर: ‘माय प्राईड माय हॅन्डलूम’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना शेफाली वैद्य, श्रीनिवास राव, मुकुंद कासट व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment