तुळशीबागेतील २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवास गुढीपाडव्याला प्रारंभ, श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने दि. ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

*तुळशीबागेतील २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवास गुढीपाडव्याला प्रारंभ*

*श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने दि. ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन*

पुणे :श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात दि. ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 पत्रकार परिषदेला संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.

गुढीपाडव्याला रविवार, दिनांक ३० मार्च रोजी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार असून त्यादिवशी सकाळी ७ पासून श्रीरामास पवमान अभिषेक, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण होणार आहे. तसेच दि. ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ९ वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी हे रामायण वाचन, दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे. तर, दि. ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांचे श्रीमत् रामायण प्रवचन होणार आहे.  

शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री कौसल्या माता डोहाळजेवण होणार आहे.

श्रीराम जन्मानिमित्त रविवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे.

 मंगळवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. बुधवार, दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीरामजन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे.

* *सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नवोदितांसह दिग्गज कलाकारांची गायनसेवा*

उत्सवादरम्यान रविवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता हिमांशु बक्षी यांचे बासरीवादन कार्यक्रम होणार आहे. तर, सोमवार, दि. ३१ मार्च रोजी मंजिरी आलेगांवकर यांचे सुश्राव्य गायन, मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी दीप्ती कुलकर्णी यांचा सोलो हार्मोनियम वादन कार्यक्रम, बुधवार, दि. २ एप्रिल रोजी वृषाली मावळंकर यांचे गायन आणि शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हे कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन भरत तुळशीबागवाले यांनी केले आहे.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment