*‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन*
*‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा*
पुणे, ता. १० – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने सादर केलेल्या ‘वासंतिक उटी भजना’ने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून श्रींच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो. त्यानुसार भाविकांकडून श्रींच्या मूर्तीला चंदन, गुलाबजल, अत्तर, केशर, गंधा या मिश्रणाचा लेप लावण्यात आला आणि संपूर्ण मंदिर परिसर मोगऱ्यासह इतर फुलांनी सजवण्यात आले. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने भजनसेवा करण्यात आली. त्यांच्या सुश्राव्य भजनाच्या स्वरांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.