!! छत्रपती संभाजी महाराज जन्मदिन !!
(१४ मे )
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले जन्म : पुरंदर किल्ला १४ मे १६५७ मृत्यू : तुळापूर, महाराष्ट्र ११ मार्च १६८९; हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
संभाजी राजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची
धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.
संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहानसहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.
तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.
१६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होतअसतानाच औरंगजेबाचा सरदार
मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना महाराष्ट्राने धर्मवीर ही पदवी बहाल केली.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जीभ कापणे यांसारख्या शिक्षा फर्मावल्या. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. .
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांचे डोळे काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त – लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चेहऱ्यावरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जीभ कापण्याची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले, तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यांची जीभ तलवारीने कापली.
शिवबाच्या छाव्याने,छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. दूरदर्शनवर स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका दाखवली होती त्यामुळे महारांजाचा खरा इतिहास लोकांपर्यंत येण्यास मदत झाली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल लिहिताना खूप मर्यादा येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज या मालिकेची संहिता साताऱ्यातील (सोनके ता. कोरेगाव )प्रताप गंगावणे यांनी लिहिली होती. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेस योग्य न्याय दिला होता. संभाजी महाराजांना जीवनात प्रचंड संघर्ष करावा लागला. स्वराज्यासाठी,धर्मासाठी केलेला संघर्ष याला तोड नाही.
संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
PUNE24 NEWS JAYSHREE DIMBLE
9623968990 / 9689934162