* सुरक्षित व सक्षम महाराष्ट्रासाठी सेलिब्रिटींची बाप्पाकडे प्रार्थना *
ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या निवासस्थानी कलाकारांकडून बाप्पांची, गौराईची महाआरती.
झीनत अमान, उर्मिला मातोंडकर, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नीलम कोठारी, झरीन खान यांची उपस्थिती.
पुणे : विघ्नहर्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित व सक्षम बनवावे, सर्वांना सुबुद्धी द्यावी, विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबावेत, यासाठी मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद द्यावा, असा आशीर्वाद मागितला.
ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महाआरती केली. पुणे अंध मुलींच्या शाळेतील ढोलपथकाने मनोहारी ढोलवादन करत मान्यवरांचे स्वागत केले. अनेक कलाकारांनी या अंध मुलींसमवेत ढोलवादनाचा आनंद घेतला. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे करत असलेले काम अतिशय समाजाभिमुख असल्याची भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली.
गणेशखिंड रस्त्यावरील काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या महाआरतीवेळी ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नीलम कोठारी, तनिषा मुखर्जी, झरीन खान, ‘सैराट’फेम रिंकू राजगुरू व आकाश ठोसर, अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता अहुजा, लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यासह कलाकार, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या तीस वर्षांपासून माझ्याकडे गौरी-गणपती असतात. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आज ही सर्व कलाकार मंडळी, आप्तेष्ट, विविध क्षेत्रातील मान्यवर आले, याचा आनंद वाटतो. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अनेक सामाजिक उपक्रमात या सर्वांचा सक्रीय सहभाग व पाठिंबा असतो, असे उषा काकडे यांनी नमूद केले