*बुद्ध पौर्णिमेनिमित्त रंगणार धम्म पहाट आणि धम्म संध्या*
पुणे : जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच बुध्द पौर्णिमेनिमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने शहरात धम्म पहाट आणि धम्म संध्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले, मागील 25 हून अधिक वर्षे विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने धम्म पहाट कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध पौर्णिमेला करण्यात येते, यंदा सोमवार, दि. 12 मे 2025 रोजी पहाटे 5 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे बुद्ध – धम्म गीतांची मंगलमय पहाट रंगणार आहे, या कार्यक्रमात सा.रे.ग.म. फेम कुणाल वराळे, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुष्का शिकतोडे, सा.रे.ग.म. फेम स्वप्नजा इंगोले , पार्श्वगायक संविधान खरात, स्वप्निल जाधव यांचे सादरीकरण होणार आहे, या कार्यक्रमाची निर्मिती आणि दिग्दर्शन दीपक म्हस्के यांनी केले आहे. तसेच यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांचे प्रबोधनात्मक किर्तन होणार आहे.
धम्म संध्या निमित्त सुप्रसिद्ध लोककलावंत, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, सुप्रसिद्ध गायक अजय दहाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘तुफानातले दिवे’ हा बुध्द-भिम गीतांचा प्रबोनात्मक कार्यक्रम पार पडणार आहे. मंगळवार, दि, 13 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वा. तथागत गौतम बुद्ध विहार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, जनरल जोशी प्रवेशद्वारा शेजारी, पुणे येथे धम्म संध्या रंगणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन दीपक म्हस्के करणार आहे. धम्म पहाट आणि धम्म संध्या या दोन्ही कार्यक्रमाची सांगता सामूहिक बुद्धवंदना आणि खिरदानाने होणार असल्याचेही परशुराम वाडेकर यांनी सांगितले.