*महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ३, ४ मे रोजी*
*’अमृत ज्ञानकुंभ’, दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन*
– केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
– ऍड. नरेंद्र सोनावणे, ऍड. प्रसाद देशपांडे यांची माहिती; देशभरातील कर सल्लागारांची उपस्थिती
पुणे: महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने ‘अमृत ज्ञानकुंभ २०२५’, या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन ३ व ४ मे २०२५ रोजी करण्यात आले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवरमधील सहकार भवनात ही दोन दिवसांची परिषद होणार असून, ‘कर सल्लागार : पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ’ अशी या राष्ट्रीय कर परिषदेची संकल्पना आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) या संस्थांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय कर परिषद होत आहे, अशी माहिती राष्ट्रीय कर परिषदेचे चेअरमन ऍड. नरेंद्र सोनवणे व ‘एमटीपीए’चे अध्यक्ष ऍड. प्रसाद देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी व्हाईस चेअरमन सीएमए श्रीपाद बेदरकर, ‘एमटीपीए’चे उपाध्यक्ष ऍड. अनुरुद्र चव्हाण उपस्थित होते.
ऍड. नरेंद्र सोनावणे म्हणाले, “उद्या शनिवारी (ता. ३) सकाळी ९.४५ वाजता केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. प्रसंगी ‘एआयएफटीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. समीर जानी, ‘आयसीएआय’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीएमए बी. एम. शर्मा यांची विशेष अतिथी म्हणून, तर ज्येष्ठ कर सल्लागार ऍड. निकिता बढेका, ऍड. दीपक गोडसे, ऍड. विनायक पाटकर, ऍड. नारायण जैन, सीए एस. वेंकटरमणी, ऍड. संतोष गुप्ता, ऍड. भास्कर पटेल, ऍड. नितीन गौतम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिल्या दिवशी सीए असित शाह, ऍड. दीपक बापट यांचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिटमधील अडचणी, बनावट बिले व त्यासंदर्भातील नियम’ यावर, तर डॉ. गिरीश अहुजा व ऍड. नारायण जैन यांचे ‘डायरेक्ट टॅक्स कोड’यावर तांत्रिक मार्गदर्शन सत्र होईल. ऍड. विद्याधर आपटे आणि ऍड. गोविंद पटवर्धन यांच्या अध्यक्षेतेखाली ‘जीएसटी की संसद’ हे विशेष सत्र होणार आहे.”
“दुसऱ्या दिवशी सकाळी ‘भारतीय न्याय संहिता आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर यातील परस्परसंबंध’ यावर ऍड. मकरंद आडकर, सीए सुहास बोरा, सीए ईशान पाटकर, सीए योगेश इंगळे यांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे. ऍड. मनोहर समाळ व सीए चंद्रशेखर चितळे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कर सल्लागारांचे भवितव्य’ यावर बोलणार आहेत. ‘सहकार क्षेत्र आणि पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ यावर सीए योगेश कासार, सीए मिलिंद काळे भाष्य करतील. ‘कौन बनेगा टॅक्सपती’ या विशेष कार्यक्रमात सीए राजेश मेहता, सीए मितीश मोदी, सीएमए प्रकाश रिजवानी, सीए जनक वाघानी, ऍड. दिनेश तांबडे, संतोष शर्मा, ऍड. सचिन कुमार, ऍड. पार्थ बढेका, सीए प्रशांत जीएस, सीएमए दीपक जोशी सहभागी होतील,” ऍड. प्रसाद देशपांडे यांनी नमूद केले.
“राष्ट्रीय कर परिषदेत प्रथमच होत असलेल्या ‘टॅक्स का ओपीडी’मध्ये प्राप्तिकर, जीएसटी, रेरा, माहिती अधिकार, एलबीटी, सायबर कायदा यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकता येणार आहे. यामध्ये अनिल वखारिया (एलबीटी), ऍड. किशोर लुल्ला (माहिती अधिकार), ऍड. मिलिंद भोंडे (जीएसटी), सीए परीक्षित औरंगाबादकर (प्राप्तिकर), डॉ. सपना देव (सायबर कायदा), ऍड. संकेत बोरा (रेरा) आपले विचार मांडणार आहेत. ‘एमटीपीए’चा ४५ वा वर्धापनदिन यावेळी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने कर सल्लागार म्हणून भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे,” असे सीएमए श्रीपाद बेदरकर यांनी सांगितले.