*’शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल**पुण्याचा स्केटिंगपटू जिनेश नानल याचा सत्कार*
चीन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. यामध्ये पुण्याच्या जिनेश शीतल सत्यन नानल याने महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिनेशला ‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार २०२३-२४’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिनेशचे कुटुंबीय व स्नेहीजनांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिनेशची आई डॉ. शीतल सत्यन नानल, वडील डॉ. सत्यन नानल, डॉ. इकबाल सय्यद, मामा विशाल खटोड (जैन), केतन नानल, क्रिश खटोड, विजय बाजी आदी उपस्थित होते.
जिनेशने गेल्या दहा वर्षांपासून प्रशिक्षक अशुतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव व कठोर परिश्रम करत भारतीय स्केटिंग विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या हॉंगकॉंगमधील वर्ल्ड गेम्स सिरीजमध्ये जिनेशने एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिपत्याखाली होणाऱ्या या स्पर्धा जागतिक दर्जाच्या खेळाडूंसाठी गौरवाचे व्यासपीठ मानल्या जातात आणि जिनेशने त्यात आपले कौशल्य सिद्ध केले आहे. चीन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी जिनेशची निवड झाली आहे.
चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जिनेशने भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. देशांतर्गत पातळीवर त्याने सलग पाचवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकविले असून, स्केटिंगमध्ये जिनेश भारतात पहिल्या, तर जगात सातव्या क्रमांकावर आहे. आई शीतल व वडील सत्यन नानल हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर असून, गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
आई शीतल म्हणाल्या, ‘मैदानाबरोबरच जिनेशचा शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग आहे. सध्या तो एमआयटी विश्वशांती विद्यापीठामध्ये संगणक अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. क्रीडा व अभ्यासात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याने शिष्यवृत्तीही मिळवली आहे. त्याच्यातील कौशल्याला चिकाटीची जोड, योग्य मार्गदर्शन मिळाले. आई-वडील म्हणून त्याच्या कामगिरीचे, यशाचे कौतुक आहे.”
प्रशिक्षक अशुतोष जगताप म्हणाले, “जिनेशच्या यशस्वी प्रवासामागे त्याची अनेक वर्षांची कठोर मेहनत, एकाग्रता, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. नेहमी स्वतःच्या मर्यादा ओलांडत यशाची नवी शिखरे पादाक्रांत करणारा जिनेश युवा स्केटर्ससाठी आदर्श ठरला आहे. हा पुरस्कार केवळ त्याचाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय स्केटिंग क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारणे आनंदाची बाब आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या या प्रवासात आई-वडील, प्रशिक्षक यांचे मोलाचे योगदान आहे. मला सातत्याने प्रोत्साहन दिल्यामुळेच यशस्वी कामगिरी करता आली. येणाऱ्या काळात ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक जिंकायचे आहे.
जिनेश शीतल सत्यन नानल, स्केटिंगपटू