*बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट*
*विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने आयोजन*
पुणे : बुद्धम् शरणम् गच्छामि…., साऱ्या विश्वाला बुद्ध हवा…, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले.. , साऱ्या विश्वाला बुद्ध हवा… अशा बुद्ध – धम्म गीतांनी आणि राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून बुद्ध – कबीर अन् तुकोबांच्या विचारांचा जागर करत बुद्ध पौर्णिमेची धम्म पहाट मंगलमय वातावरणात रंगली.
जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने ‘धम्मपहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेला हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे संपन्न झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, श्रामणेर, भंते यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पाठणाने धम्मपहाट कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहाटेच्या हलक्याशा गारव्यात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांनी वारकरी आणि बुद्ध विचारांचे नाते उलगडले. वारकरी समाजाचा पाया तथागत गौतम बुद्धाच्या विचारातच असल्याचे सांगताना त्यांनी जगदगुरु संत तुकारांच्या अभंगाचा बुद्ध तत्वज्ञानाशी असलेला संबंध आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांना सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला न्याय आणि समतेचा संदेश देणारे बुद्ध तत्वज्ञान व वारकरी संप्रदायातील संताच्या विचारातून आल्याचेही वाबळे महाराजांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात “बोलो जय भीम….., सरे रात काळी ……., भारत भू के क्रांती सूर्य को प्रणाम.., भीमरायाने किमया ही केली.., माझी आजी म्हणायची..” अशा एकाहून एक सरस बुद्ध – भीम गीतांचे सादरीकरण सा.रे.ग.म.प. फेम प्रसिद्ध पार्श्वगायक कुणाल वराळे, सा.रे.ग.म. फेम अनुष्का शिकतोडे, पार्श्वगायिका स्वप्नजा इंगोले, गायक संविधान खरात, गायक स्वप्निल जाधव आणि त्यांच्या वाद्यवृंदाने सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
धम्म पहाट कार्यक्रमाबद्दल बोलताना आयोजक परशुराम वाडेकर म्हणाले, यंदा धम्मपहाट कार्यक्रमाचे 20 वे वर्षे आहे. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. त्याप्रमाणे पुणे शहारातही आम्ही धम्मपहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा साजरी करीत आहोत. बुद्ध पौर्णिमेच्या काही तास आधी भारत – पाकिस्तान मधील युद्धबंदी चा निर्णय म्हणजे जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा हाच संदेश देणार आहे.
धम्म पहाट कार्यक्रमाची सांगता पाहेलगाम हल्ल्या तील मृतांना आणि त्यानंतर पाकच्या गोळीबारात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आणि राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाची निर्मिती आणि निवेदन दीपक म्हस्के यांचे होते.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
PUNE24 NEWS JAYSHREE DIMBLE
9623968990 / 9689934162