*कॉस्ट अकाउंटंट्स संस्थेच्या पुणे विभागाचा हीरक महोत्सव पुण्यात*
*द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण*
पुणे : द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हीरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दिनांक ९ ते ११ मे दरम्यान तीन दिवसांचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात औद्योगिक क्षेत्रातील सभासदांसाठी विशेष सत्र, व्याख्याने, मान्यवरांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया, पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष, इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएमए) माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर, माजी केंद्रीय समिती सदस्य सीएमए संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया, पुणे शाखा माजी अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, पुणे शाखा सदस्य सीएमए विश्वनाथ जोशी उपस्थित होते.
शुक्रवार (दि.९) आणि शनिवारचे (दि.१०) सत्र कर्वेनगर येथील सीमए भवन येथे तर रविवारचे (दि.११) सत्र एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव शाळेच्या शकुंतला शेट्टी आॅडिटोरियम मध्ये पार पडणार आहे. महोत्सवात दिनांक ९ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच तीन दिवसात विविध विषयांवर सत्रे होणार आहेत.
दिनांक १० मे रोजी मेंबर्स इन इंडस्ट्री कॉन्क्लेव आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिक्लचर (एमसीसीआयए) चे २०२२-२०२४ कालावधीतील अध्यक्ष दीपक करंदीकर उपस्थित राहणार आहेत. या कॉन्क्लेवमधील मुख्य आकर्षण म्हणजे ६० हून अधिक ज्येष्ठ सीएमए यांचा सीएमए अचिव्हर्स म्हणून गौरव केला जाणार आहे. तसेच, दिनांक ११ मे रोजी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे, किशोर पंप प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात गुरुदेव श्री श्री रविशंकर हे आॅनलाइन माध्यमातून संवाद साधणार आहेत.
सन १९६५ साली पुण्यात स्थापन झालेल्या या विभागाने आजवर ४० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले असून २२०० हून अधिक विद्यार्थी प्रमाणित कॉस्ट अकाउंटंट्स म्हणून घडवले आहेत. सल्लागार समितीतील द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया पुणेचे माजी अध्यक्ष डॉ. नरहर निमकर, पुणे विभाग माजी अध्यक्षा मीना वैद्य, उपाध्यक्ष श्रीकांत इप्पलपल्ली, मानद सचिव राहुल चिंचोलकर, खजिनदार हिमांशू दवे, सदस्य नागेश भागणे, अमेय टिकले, तनुजा मंत्रवादी, अनुजा दाभाडे, निखिल अग्रवाल, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप माने देशमुख यांसह कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी अध्यक्ष सीमए डॉ. धनंजय जोशी मार्गदर्शक असून विविध मान्यवर सल्लागार व कार्यकारी मंडळ यासाठी सक्रिय आहेत. सध्याचे अध्यक्ष सीमए निलेश भास्कर केकाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागाचा महोत्सव होत आहे.
इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया ही संस्था जागतिक स्तरावरील उद्योगांच्या आर्थिक नेतृत्वासाठी संसाधने आणि व्यावसायिकांची प्राधान्याने निवडलेली स्त्रोत संस्था असेल, हे संस्थेचे व्हिजन आहे, तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट व्यावसायिक जागतिक स्तरावर नैतिकतेने उद्योग चालवतील आणि धोरण, व्यवस्थापन व लेखा यांचे एकत्रित कौशल्य वापरून सामाजिक-आर्थिक संदर्भात भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती करतील हे संस्थेचे ध्येय आहे.